होता माझ्याकडेही कधी काळी एक चांदोबा,
शांत निर्मळ प्रेमाचा सागर असलेले माझे बाबा...
सीमोलघंन करुन आल्यावर आम्हाला ओवाळणारी आई,
आमच्या कुटुंबावर सदा वरदहस्त ठेवणारी अम्बेजोगाई...
छानसं सजलेलं होतं आमचं छोटसं घरकुल,
आई-बाबांच्या संसारवेलीवरचं मी प्राजक्ताचं फ़ुल...
निरभ्र आकाश निमिषात झाकोळावं तशी अवचित द्रुष्ट लागली,
भर दुपारी आईची किंकाळी ह्रुदयाला चिरा पाडत गेली...
अफ़ाट जगात आम्हाला सोडुन बाबा दुर निघुन गेले,
प्रेम करण्याची दैवी देणगी जाताना माझ्यात रुजवून गेले...
त्यांनी केलेले संस्कार मी आजन्म जपणार आहे,
त्यांची निशाणी - ही कळी मी जीवनभर फ़ुलवणार आहे...