Showing posts with label Compose. Show all posts
Showing posts with label Compose. Show all posts

Friday, December 28, 2018

असा होता माझा दादामामा !!!

होता सगळ्यात मोठा पण खेळताना जसा माझाच दादा 
म्हणायचा मला गमतीने "पराजकता कि फिजक्ता"... 
मी चिडले कि मनसोक्त हसायचा माझा मामा 
ऐकून माझं उत्तर "दादामामा कि फिदामामा" !!!

सगळे सुखाचे सोबती असतात असं ऐकलं होतं,
मामाच्या बाबतीत मात्र हे सपशेल खोटं होतं..
माझ्या आणि आईच्या सगळ्याच दुःखी क्षणांमध्ये 
मामाच्या साथीचं पागडं तेवढं भारी होतं... 

बाबा होते तेव्हाही आणि बाबा नव्हते तेव्हाही,
मामाचा आधारवड नेहमीच आमच्या सोबत होता...
दैवाने साथ दिली नसली म्हणून काय झालं, 
आईचा दादा सततच आमच्या पाठीशी होता.. 

हॉस्पिटल असो, छोटं गाव असो, घर आम्हाला असो-नसो. 
नशिबाच्या साथी साठी रोज वणवण भटकंती असो. 
आईच्या माझ्यासवे एकटीने जगण्याच्या खटाटोपात 
कितीक सामोरलेल्या संकटांच्या दुतर्फा रांगा असो... 

आमच्यासाठी आमचा देव तोच एक होता 
ज्याच्या मदतीने आम्ही स्वतःला सावरायला शिकलो... 
आम्हाला पकडून धरलेला तोच खंबीर हात होता 
ज्याच्या साहाय्याने आम्ही परत जगायला शिकलो... 

काळ गेला,दुःख सरलं, मामाची माया नाही सरली... 
बाबांच्या प्रत्येक वर्ष-दिवशी ती ओसंडून वाहिली...
बाबा नसले तरी तुझ्या पाठीशी तुझा मामा आहे सर्वदा 
त्या एका आवाजाने मला नेहमीच हि जाणीव दिली... 

एका वर्षी असा फोन आला नाही म्हणून कारण विचारलं,
आता तुझ्या आयुष्यात दुःखाची जागा नाही असं उत्तर मिळालं...
माझ्या लग्नाच्या दिवशी भरभरून आशीर्वाद देताना 
त्याच्या डोळ्यातलं पाणी माझ्यासाठी सुख सांडून गेलं... 

अमेरिकेत होते तेव्हा माझ्यापेक्षा मामाच जास्त खुश होता, 
पृथ्वीवरच्या स्वर्गात आहेस असं कौतुकाने म्हणाला होता... 
जगात देव आहे कि नाही मला खरंच माहित नाही, 
माझ्या आणि आई साठी मात्र हाच एक देवात्मा होता !!!

-- प्राजक्त 
२८-डिसेंबर-२०१८

Wednesday, October 12, 2016

आई - तूच माझा बाप्पा !!!


आई आज तुझा वाढदिवस... माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण,
या दिवसाच्या निमित्ताने चल वेचू यात आपण आठवणींचे सांडलेले कण...

ती बदकामागे पळत सुटलेले मी आणि मागे धावणारी आई,
डोळ्यात पाणी... पडेल आपलं लेकरू खेळता खेळता या भयापायी

शाळेची परीक्षा तापात दिलेली मी आणि मला कडेवर नेणारी तू,
श्रमांचं सार्थक झालेलं पाहता तुझ्या डोळ्यांतले आनंदाश्रू उतू

प्रत्येक सुख-दुःखाला आपण एकमेकींना दिलेली साथ,
माझ्या जीवनातला तू माझा कधीही न सोडलेला हात

आठवते मला माझी आई "औक्षवंत हो बाळा" माझ्यासाठी लिहिताना,
आणि एखाद्या प्रथेसम रडणाऱ्या आपण दोघी, दर वेळी सोबत ते वाचताना

माझ्या शिक्षणासाठी आजवर हरेक निमिष तू झटलीस,
नोकरीसाठी लांब पाठवताना मात्र जीव तोडून रडलीस

माझ्या आयुष्याचं सोनं करणारा तुजसम परीस मला मिळाला ही देवाची कृपा
खरं तर खरा देव कुठे कोण जाणे पण इतकं मात्र नक्की - तूच माझा बाप्पा !!!

Wednesday, March 30, 2016

Miss you india !!!


झोळीत आठवणींची शिदोरी बांधून निघाले आहे,

माझ्या माय अन मायभूमीला नमून निघाले आहे,
जिवलग सख्यांना मनी-मनीच घट्ट मिठी मारून
पापणीची ओळी कड हळूच ओलावत निघाले आहे…

आईच्या हातच्या जेवणाने मन रोज तृप्तत होतं,

बाबांनी कसं कितीदा मजेमजेत चिडवलं होतं,
मावशी, मामा, ताई अन भाऊच्या संगतीत
जणू बालपणच प्रत्यक्षात अवतरलं होतं…

सासू-सासरे नाहीत, माझे आहेत आई-वडीलच ते,

चहूबाजूंनी प्रेम आमच्यावर बरसत होते,
किती स्वत:ला त्रास करून घेऊन सुद्धा
आमच्यासाठी किती कष्ट तेच झेलत होते…

जुन्या प्रेमाच्या नात्यांना अलगद नव्याने भेटून,

मुलीना त्यांच्या मातृभूमीची झलक दाखवून,
असंख्य अनमोल क्षणांना परत परत आठवत,
धरतेय परतीची वाट बाप्पाला सोबत घेउन…

Friday, March 20, 2015

माई

आज तुला जाऊन माई पूर्ण २ वर्षे झाली,
तुझ्या आठवणीत सारी दुनिया माझी भिजली..

अजूनही कानावर येते तुझी "तका" अशी साद,
जाणवतो अजूनही तो पाठीवर थोपटणारा हात.. 

आई रागवताना कशी तुझ्या मागे लपायचे मी,
दुधावरची साय बनून तुझ्या कुशीत शिरायचे मी..

आठवतो तो प्रेमळ चेहरा मला जेऊ घालतानाचा,
माझं उष्टं तोंड पुसणारा पदर तो तुझ्या साडीचा..

माझ्या कौतुकाची तुझी पत्रं अजूनही वाचते मी,
त्यातून अखंड सांडत असलेला तुझा आशीर्वाद घेते मी..

आईकडून ऐकते नेहमी मी आठवणी तुझ्या-तिच्या,
जपल्यात तिने एका अनमोल कोनाड्यात मनाच्या..

आईच्या त्या आठवणींत तू आहेस जिवंत अजून,
तिच्या हरेक अश्रूत सापडते तुझे हसू अजून..

जिथे आहेस आता तिथे खूप सुखी राहा माई,
आशीर्वाद देत राहील सदा आपली अंबेजोगाई.. 

Saturday, October 12, 2013

आई - तुझ्यासाठी !

आठवते का तुला तुझी खोडकर लहानशी लेक,
मला तीच बनायचय परत एकदा आजचा दिवस एक..

तुला सतत दमवणारी, परेशान करणारी,
आपल्या मस्तीने तुझ्या नाकात दम भरणारी..

तू शिकवलेले धडे एका दमात गिरवणारी,
रात्री अंगठा चोखत तुझ्या कुशीत झोपणारी..

तुझा पदराला तोंड पुसत कधीच मोठी झाले मी,
तुझ्या लाडवांचा घास घेत अजून लहान राहिलीये मी..

आपल्या लेकीचे लाड पुरवणारी आई झाले आहे मी,
तरी कौतुकाच्या थापेसाठी तुझीच वाट पाहते मी..

आई तुझ्या हातांची चव नाही इथे कोठे चाखली,
तुझ्या आवाजातली तळमळ नाही कधी जाणवली..

तुझा मायेचा स्पर्श, तुझ्या हातांची मिठी,
वाट्टेल ते करेन मी फक्त तुझ्या आनंदासाठी..

नको मला काही दौलत, नको काही धन,
तूच माझी सारी माया, तूच माझे जीवन..

तुला तुझ्या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा,
तुझे आशीर्वाद सतत असावे हीच मनी इच्छा..

Saturday, July 27, 2013

क्षण आठवणीतले

वाटतं कधी कधी एकटच जगावं,
स्वत:च्या जगात स्वत: हरवून जावं..
नाजूक आठवणींचे टपोरे थेंब अलगद 
ओंजळ भरली तरी आपलं मोजतच राहावं.. 

हळव्या मायेचे, कधी सोनेरी सुखाचे, 

आठवावे कधी क्षण ते सुंदर स्वप्नांचे.. 
धुंवाधार पावसात धुंद होऊन भिजणारे, 
इंद्रधनुषी रसरंगात रंगून जायचे.. 

दु:खात होरपळलेले अन कणकण जळलेले, 

अनोळखी झालेल्या ओळखीने मन जे रक्ताळलेले..
आठवावे क्षण ते ओल्या वाहत्या जखमांचे, 
कोणाच्यातरी नसल्याने जागच्या जागी थिजलेले..

सुखाचा असो वा दु:खाचा, वाईट वा चांगला, 

हरेक क्षण आयुष्यातला प्रामाणिक जगलेला.. 
याच क्षणांना स्मरून परत नव्याने जगावे, 
बांधावा परत आपला मोडलेला वाळूचा किल्ला..

Monday, June 24, 2013

प्रिय तनु,

कशी अचानक आनंदलाट घेऊन आली हि सांज,
तुझे निरागस डोळे मला इथूनही दिसले आज…  
तुझ्यासंगे बोलताना सखे इतकी मोकळी झालेय मी, 
स्वप्नातही झुल्यांवर झुलणार आहोत आपण आज…   

तुझा आवाज, तुझा हसणं, माझ्या मनाला साद घालणं,
"मन्या" म्हणत हलकेच माझ्यातलं लहानपण जागवणं…  
कधी जिवलग मैत्रीण बनून तर कधी मोठी दि बनून, 
आपला हात माझ्या पाठीवर आश्वासक थोपटणं…  

सुखाचे दिवस तुझ्यासंगे दामदुप्पट होऊन जातात, 
दु:खी क्षण कसे आपल्या बोलण्यात विरघळतात…  
संकटं तर माझी तुझ्यासमोर यायला घाबरतात, 
आनंदघन गडे माझ्या चहुबाजूला बरसतात…  

तुझ्या माझ्या मैत्रीचा गंध असा दरवळतो, 
जणू देवाचा गाभारा मंद उदबत्तीने उजळतो…  
त्याला मी नत होते तेव्हा चमकून तो बघतो, 
कारण माझा बाप्पा मला नेहमी तुझ्याच रुपात दिसतो… 

Sunday, June 16, 2013

Tanvi's Father's Day !!

Wish you a very Happy Father’s Day Baba !!
बाबा आज तुझ्याबद्दल थोडं लिहितेय तुझी लाडोबा…

Office मधून येतोस तू घरी दमून भागून, 

थकान सारी पळते तुझी मला कवेत घेऊन…

माझ्या एका हाकेसाठी सदा आतुर तुझे कान, 

खेळताना माझ्यासंगे होतोस माझ्याहूनही सान…

कितीही करो मी मस्ती, माझ्या बाबाला आवडतं,

त्याच्या उत्साही चेह-यावरून ते लगेच जाणवतं…

माझ्या एका हासू ने हसणारा माझा बाबा, 

माझ्या एका आसू ने पाझरणारा माझा बाबा…

तुझी साथ हवी सतत तुझ्या या सानुलीला, 

तुझ्याशिवाय एक क्षणही नकोसा होई मला…

असं आहे आपलं नातं जगात सगळ्यात सुंदर, 

म्हणून तर We’re BEST for each other !!!

Happy Father's Day Baba !!

दिवस गेले, महिने गेले, वर्षांमागून वर्षे गेली,
तुमच्या आठवणीनी तरी आजही मनात गर्दी केली… 
सगळ्यांना आपापल्या बाबासोबत आनंदाने पाहताना 
हळूच देवाकडे तुमच्या सुखासाठी मागणी केली… 

लहानपण सगळं माझ्या नजरेसमोरून सरकलं,
डोळ्यातल्या पाण्यासोबत मनात हसू घेऊन आलं… 
आई मला रागावतानाचा पडलेला चेहरा तुमचा,
आज कोणी रागवायला नसतानाही हवाहवासा वाटला… 

माझ्या प्रत्येक यशामध्ये खुश झालेले माझे बाबा,
माझ्या प्रत्येक आजारात हमसून हमसून रडणारे बाबा… 
मी दूर जाऊ नये म्हणून घरजावई आणायचं ठरवणारे बाबा,
असं म्हणता म्हणता स्वत:च दूर निघून गेलेले बाबा… 

कितीही दूर असलात बाबा, तुमची आठवण अजून ताजी आहे,
तुमच्या संस्कारांची वात अजून मनात तेवती आहे… 
अभिमान वाटेल माझा तुम्हाला, अशीच सदा वागेन मी,
तुमच्यासारखीच होईन मी, तुमचीच तर मुलगी आहे… 

तुमच्या प्रत्येक शब्दाची जादू अजून कानात आहे,
तुमच्या हाताच्या स्पर्शाची माया अजून मनात आहे… 
जन्मदात्याला विसरून मी जगेन तरी कशी सांगा,
तुमच्याच रक्ताची धार दौडते माझ्या तनुत आहे… 

Happy Birthday Mohana !!

नवी जागा नवं शहर, म्हणून जरा घाबरले होते,
सगळेच अनोळखी चेहरे पाहून जराशी गांगरले होते… 

अशा वेळी एक छुटकी चुटकीसरशी आयुष्यात आली, 
देवानेच जणू आमची भेट मुद्दाम घडवून आणली… 

आवाजात तिच्या आपलेपणा भरून राहिला होता, 
शब्दांमधून मोकळेपणा दिलखुलास सांडत होता… 

हळू हळू आमचं नातं अधिक घट्ट विणलं गेलं,
माझ्या कानात तिची अनेक गुज सांगून गेलं… 

दिसते जरी कणखर, हि आहे खूप हळवी,
जिंकून घेते प्रेमाने, आहे खूपच लाघवी… 

आळस म्हणजे नक्की काय हिला माहितच नाही,
कामांमधून हिला रिकामा वेळ सुद्धा मिळत नाही… 

अशा माझ्या सखीचा आहे आज वाढदिवस 
आमच्यासाठी आज म्हणजे मोठाच शुभदिवस… 

अंगणी तुझ्या सुखाचा सडा, हि बाप्पाला प्रार्थना 
Wish you a very Happy Birthday Mohana !!

Wednesday, March 20, 2013

माई आजी !!

जगातलं सगळं प्रेम या शब्दातून ओसंडू पाहतं.. 
ऐकताच मन अगदी लहान बाळ होऊ पाहतं.. 
त्या मायेच्या कुशीत आवेगाने शिरताना 
त्या घट्ट मिठीत बंदिस्त होऊ पाहतं..

आपल्या आई-बाबांची असते ही माय, 
तिच्यासाठी आपण म्हणजे दुधावरची साय..
आपल्याच आनंदासाठी तळमळणारा जीव तिचा, 
तिच्यासाठी सुख काय अन दु:ख्ख तरी काय !!

पोटाच्या लेकरांहूनही जीव तिचा नातवंडात, 
आनंदाने फुलून जाते ती पाहून आपल्याला सुखात.. 
कणकण झिजते आपल्यासाठी हि आपली माई, 
आपल्याशिवाय उतरत नाही तिचा घशाखाली भात..

अशीच होती आजी माझी, जणू मायेचं दुसरं नाव,
जिव्हारी माया अन डोळ्यात ओथंबलेला प्रेमभाव.. 
नाही दिसणार ते हात आता, बसलाय न भरणारा घाव,
दूर निघून गेली ती, संपवून भातुकलीचा डाव..

माई पण आता तू रोज मला पाहू शकशील, 
जिथे आहेस तिथूनही माझी दृष्ट काढू शकशील.. 
प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी ठाम उभी राहशील, 
हरेक क्षणी मला सुखाचा आशिष देत असशील.. 

तू मात्र माई आता फक्त तुझी काळजी घे, 
आमची काळजी घेणं आता तरी सोडून दे.. 
बाप्पाजवळ आहेस त्याला माझा निरोप दे, 
स्वर्गात माझ्या माईला खूप खूप सुख दे.. 

Saturday, September 1, 2012

चुकलेलं स्टेशन !

अथश्री मधून परत येताना पावले जड झाली होती. आजी-आजोबांची पायधूळ घेताना पापणी जड झाली होती.. पंधरा दिवसांपूर्वीच ठेवलं होतं दोघांना या आश्रमात.. त्यांच्या डोळ्यात पहायची पण हिम्मत नव्हती माझ्या मनात.. पण का कोण जाणे.. त्यांच्या ओठांवर मात्र काहीच प्रश्न नव्हते.. कसलीच शिकायत नव्हती.. उलट आशीर्वाद होते.. आयुष्यभर या दोघांनी आपलं चांगलच चिंतलं.. कित्ती त्रास द्यायचो आपण लहानपणी.. पूर्ण घराण्यात "सगळ्यात खोडकर कोण?" या प्रश्नाला डोळे-कान बंद करून नुकतच बोलू लागलेलं शेम्बडं पोर पण सांगेल -- प्लाजत्ता.. अशा खोडकर स्वारीला सांभाळणं फार जिकिरीचं काम असायचं. पण ही दोघं.. देवमाणसं.. सांभाळलं दोघांनी मला.. ते ही कधी न रागवता.. आई चिडायची माझ्या खोड्यांनी कधी कधी !! पण आजी मात्र हळूच जवळ येउन लाडू द्यायची तोंडात.. आणि आईला म्हणायची, "नको गं लेकराला रागे भरूस.. दुधावरची साय आहे माझी ती !!"

काय झालय आज आपल्याला.. खरचच मन खूप अस्वस्थ झालय. सुचेनासं झालाय काहीच. असं वाटतंय कि सगळे बंधनं झुगारून देऊन स्वतंत्र व्हावं आणि मनाला येईल तसं आयुष्य जगावं. जे केलं नाही अल्लड वयात, भावनेच्या भरात, उनाड मस्तीत.. ते सगळं आता शांतपणे करावं. "मी आईचा मुलगा आहे" असा नुसतं घोकण्यापेक्षा तसं करून दाखवावं.. 

नवीन नवीन नोकरी लागली तेव्हा.. वाट्टेल तसे पैसे खर्च केले.. पार्ट्या केल्या.. भरगच्च फ्रेंड्स, होस्टेल, विकली पिकनिक्स, मुव्हीज.. एक ना अनेक.. खुप्प मज्जा केली त्या दिवसांत. काहीच कल्पना नव्हती खऱ्या आयुष्याची. जीवनाला काही दिशाच नव्हती तेव्हा. बारावी नंतर कम्प्युटर विषय घ्यावा कि नाही हे जिला बारावी चा निकाल लागला तरी कळत नव्हतं.. अशा मला काय सिरियसनेस असणार आयुष्याचा.. ही सगळी मज करताना एकदा पण नाही जाणवलं कि या मजेपुढेही काही आयुष्य आहे.. ज्यात खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. आधी त्या पार पडून मग नवीन जबाबदाऱ्यासाठी स्वत:ला मुक्त करायचं आहे.. त्या आधीच पुढचं स्टेशन आलं तर ही वेळ निघून जाईल. हातात काहीच नाही उरणार.. उरेल फक्त एक उसासा.. आणि फक्त एक आसू.. तो ही खालमानेनं निसटेल हळूच..

आता विचार करते तेव्हा वाटतं.. तेव्हाच्या माझ्या सगळ्या फ्रेंड्सना कळत होत्या या सगळ्या जबाबदाऱ्या.. मीच फक्त अशी होते.. स्वप्नांच्या जगात वावरणारी.. पऱ्यांच्या दुनियेत रमणारी.. अनादी, स्वच्छंद.. खरं सांगायचं झालं तर मूर्ख ! तेव्हाच जर मी ही शहाणी असते, स्वत:चं लाईफ़, फ्रेंड्स, इमोशन्स अशा आत्मकेंद्रित आयुष्यातून सुटून भविष्याकडे पाऊल टाकलं असतं.. लग्न का ठरत नाहीये अशा गोष्टीसाठी रडण्यापेक्षा आत्ताच्या क्षणाला निसटू दिलं नसतं.. पुढच्या स्टेशनची वाट पाहण्यापेक्षा आत्ताचं स्टेशन चुकवलं नसतं.. तर आज माझ्या आई-बाबांसाठी हक्काचं निवासस्थान असतं.. एक हक्काचं घर बांधता आलं असतं.. आणि आज मी गर्वाने माझ्या भूतकाळाला आणि वर्तमानालाही सांगू शकले असते, "Hey there, just dare!!"

आज त्या घरात माझे आई-बाबा, आजी-आजोबा.. सगळे सुखात राहिले असते.. स्वत:च्या घरात राहिले असते.. अथश्री चा आधार नसता लागला मग माझ्या कुटुंबाला. स्वत:च्या हातावरचं माझ्या पायांवर उभं केलं मला आईने.. आत्मसन्मानाने जगायला शिकवलं मला आईने.. नोकरी करण्याइतपत समंजस, स्वावलंबी आणी हुशार घडवलं मला आईने.. आणि जेव्हा हे सगळं झालं, तेव्हा मात्र स्वत:च्या पायावर उभं राहून पण माझे हात मोकळे नाहीयेत याच लोकांना आधार द्यायला.. त्यांची काठी मला आश्रमात सापडते आहे.. माझ्या घरात नाही.. 

"आई, what are  you thinking about? am calling you like crazy!!" तानी हाक मारत होती. अरे.. घर आलं पण. इतका वेळ चालत आलो आपण. पाय दुखले नाहीत? कसे दुखतील.. आजीने लहानपणी मालीश नव्हतं का केलं त्यांना. विषण्ण मनानं हसले मी! माझं तसं हसणं आणी माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून तानी घाबरली.. ते बिचारं छोटं कोकरू मला बिलगून म्हणालं, "काय झालं मम्मा? माझं काही चुकलं का?" तिला घट्ट मिठी मारत मी म्हटलं, "नाही रे राजा.. तुझं नाही.. माझं चुकलंय. ती चूक सुधारण्याची वेळी निघून गेलीये आता.." तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मला सांगून गेलं कि तिला काहीच कळलं नव्हतं. मी तिला इतकच म्हटलं, "आजी-आजोबांची आठवण येतेय मला.." आणी तानी एका सेकंदात म्हणाली, "आई, you don't worry at all.. मी कमवायला लागले ना, कि आपण नक्की आणू ग्रेट आजी-आजोबांना आपल्या घरी.." त्या क्षणी तानी मध्ये मला माझं बालपण दिसलं. असं वाटलं, बाप्पाने परत तानीइतकच लहान करावं आपल्याला.. म्हणजे आज तानीला जे समजतंय, ते मलाही त्याच वयात समजेल आणी परत कधीच हे स्टेशन चुकणार नाही.. 

Wednesday, August 15, 2012

वरणफळं

रात्रीची वेळ होती. जेवण वैगेरे सगळं आटोपून शतपावल्या करण्यासाठी ती गैलरी मध्ये आली. तसं आज सकाळपासूनच तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. मुलीचा आवाज ऐकायची ओढ लागली होती. गैलरीतल्या आरामखुर्चीत बसल्या बसल्या ती विचार करत राहिली. कसं गेलं आपलं आयुष्य.. सगळं मुलीच्या मागे.. तिचा अभ्यास, तिची शाळा, तिची स्पर्धा, स्पर्धेची तयारी, वाढदिवस.. एक ना अनेक.. सगळं नाचतंय आज डोळ्यांसमोर एक एक करत. मुलगी म्हणजेच आपलं आयुष्य होतं. तिच्यासाठीच प्रत्येक क्षण वेचला, प्रत्येक सुखाचा अंकुर तिच्यासाठी सांभाळून ठेवला. वाट्याला आलेलं दु:ख मात्र एकटीने सहन केलं. मुलीच्या केसालाही त्या आगीची झळ लागू दिली नाही.. स्वतः कामाचे रगाडे हाकत मुलीला आरामात वाढवलं. आज मुलगी मोठी झालीये, चांगली शिकलीये, नोकरीला लागलीये.. लग्न झालंय आणि आपल्याला छानशी नात पण झालीये.. पण ती सगळी आहेत मात्र लांब. सातासमुद्रापार.. लहानपणी इतकं करताना पण मन आणि शरीर थकायचं म्हणून नाही.. आणि आज.. काहीच न करता का असा थकवा येतोय? मुलगी लांब असल्याचं का सारखंच जाणवतंय? डोळे टचकन का भरून येताहेत..? बंद डोळ्यांना नातीला कडेवर घेतलेली आपली लेकच दिसतेय सारखी.

वरणफळं.. आज जेवायला वरणफळं केले होते. किती आवडतात मुलीला.. प्रत्येक वेळी नोकरीला पुण्याला असताना घरी यायची सुट्टी घेऊन तेव्हा तिला वरणफळंच लागायची जेवायला. आपण म्हणायचो, "अगं छान करते काहीतरी.. पुरणाची पोळी करते, बटाटेवडे करते.. तरी तिचं एकच पालुपद.. "तू ते सगळं नंतर कधी तरी कर गं.. आल्या आल्या मला गरमागरम वरणफळं हवीत ताटात.." आणि वरणफळं खाता खाता आमच्या गप्पांना सुरवात व्हायची.. माझं मन त्या गप्पांकडे कमी आणि तिच्या वरणफळं खात असलेल्या समाधानी चेहऱ्यातच जास्त गुंतायचं.. सकाळपासूनच्या सगळ्या श्रमांचा चीज व्हायचं. आता येत असतो तिचा फोन कधी कधी.. खूप खुश असते मुलगी.. नातीचं कौतुक सांगते, आपल्या तब्येतीची चौकशी करते.. पण तरी काहीसं अधुरं-अधुरंच वाटतं.. असं वाटतं.. अचानक समोर येऊन गळ्यात पडेल आणि म्हणेल, "आई, अशी काय बसलीयेस? जेवलीस की नाही? मला वरणफळं करून दे आताच्या आता.. " आणि इतकी थकून सुद्धा मी नव्या जोमाने उठून करायला घ्यावेत वरणफळं.. 

आपल्या प्रत्येक वाढदिवसाला असायची ती आपल्यासोबत.. नात होईपर्यंत तिचा हा क्रम काही चुकला नव्हता.. सोबत रामाला जायचो आम्ही.. माझ्या वाढदिवसाला पण तिलाच काहीतरी नवीन घ्यायचे मी.. स्वत:ला नवीन घेऊन घालण्याच्या आनंदापेक्षा तिच्या अंगावरचा नवीन ड्रेस जास्त भावायचा मनाला.. 

इवल्याश्या आपल्या लाडकीला घेऊन नवी-नवी आई बनून घरी आली होती माझी लाडकी.. आई झाल्यावरचे सगळे रंग तिला हळू हळू कळायला लागले होते.. लहान असताना मी काळजी करायचे खूप म्हणून चिडायची माझ्यावर.. आता तिचा काळजी करायचा टप्पा सुरु झाला होता.. आता आम्ही माय-लेकींपेक्षा जास्त मैत्रिणी झालो होतो.. माझी दगदग तिला हळू हळू समजायला लागली होती.. ती दूर असतानाची माझ्या मनाची तडफड जाणवायला लागली होती तिला.. 

अशातच मग एकदा जावयाच्या लांबच्या नोकरीचा निरोप आला.. जायच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी रात्रभर जगलोत.. खूप गप्पा मारल्या.. माझ्या लहानपणापासूनच्या तर नातीच्या बालपणाच्या.. होत्या-नव्हत्या सगळ्या आठवणी, सगळं सुख, सगळं हसणं, सगळं जगणं त्या एका रात्रीत जागून घेतलं.. शेवटी मात्र दोघी अगदी गळ्यात गळे घालून रडलोत.. मनसोक्त झोकून दिला स्वत:ला एकमेकींच्या कुशीत.. असं वाटलं मिठी इतकी घट्ट करावी की मुलीला ती सोडताच येऊ नये.. आणि ती लांब जाऊच नये.. पण.. सुटली मिठी.. गेलं माझं कोकरू सातासमुद्रापार.. 

अरे आली का मुलगी? ये की गं कुशीत माझ्या.. जवळ बैस माझ्या.. किती काळाच्या गप्पा मारायाच्यात तुझ्याशी.. किंवा गप्पा पण नको.. तुझा स्पर्श मला जाणवत राहू देत फक्त असाच! माझ्या जगण्यात तुझं असणं हीच एक आस आहे.. तुझ्या प्रत्येक हसण्यात माझा एक-एक श्वास आहे.. तुझी वाट पाहणं हाच मनी ध्यास आहे.. तू खरंच आलीयेस का हा माझा भास आहे?

अरे, बराच वेळ झाला नाही आपण इथे खुर्चीत बसलोय.. कसला विचार करतोय.. दिवास्वप्न होतं बहुतेक.. आता इतक्यात काही लेक येणार नाही घरी.. फोन पण येऊन गेला आहे परवा.. आज नाही यायचा.. गडबडीत असेल स्वयंपाकाच्या.. असा विचार करून ती परत बसली खुर्चीत.. तेवढ्यात फोन वाजला.. रिंग रिंग.. इतक्या रात्री फोन करणाऱ्याला शिव्या देत थकल्या पावलांनी तिने सावकाश जात फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला,
"आई, अशी काय बसलीयेस? जेवलीस की नाही? मला वरणफळं करून दे आताच्या आता.. आणि फोनवर काय बोलतीयेस? दरवाजा उघड.. मी आहे बाहेर.. "

Monday, August 13, 2012

आठवणी.. चिंब ओल्या..

खूप काही लिहावसं वाटतंय पण सुचत काहीच नाही...
भावना मनात दाटलेल्या पण ओठांवर काहीच उमटत नाही..
आज अचानक सरस्वती देवी का अशी रागवली माझ्यावर
तिच्या आशीर्वादांची चाहूल दूरवर कुठेच लागत नाही..

पाऊस पडतो आहे बेभान, मन असंच वारा वारा..
घेऊन येतंय मुठीत पकडून खाली पडलेल्या गारा..
कशाच्या धुंदीत इतकं गुंतलंय कळतच नाहीये
त्या इंद्रधनुच्या मागे सुसाट पळतंय सैरावैरा..

लहानपणीचे दिवस आठवून मग मन ही गेलं भूतकाळात..
शाळेतून परत येतानाचं भिजणं आणी रेनकोट मात्र दप्तरात..
ओलीचिंब छकुली पाहून मग आईचं खोटा खोटा राग-रुसवा
जो बुडून जायचा चहाच्या एका गरम गरम घोटात..

मैत्रिणींसोबत भिजतानाची आठवली ती मस्ती..
होस्टेलच्या अंगणात जेव्हा एखादी कोकीळ गाणे गाती..
सुख-दु:खाच्या आठवणी एकमेकींकडे साठवताना
नकळत दिलेल्या वचनांनी जसे आज स्मरतात सोबती..

आज ही आहे तोच पाऊस, आजही कोकिळेचा आवाज आहे..
त्यातलं माधुर्य मात्र केव्हाच गळून गेलं आहे..
सख्यांना आठवता आठवता पाणावलेले डोळे
ते पुसायला ही आज फक्त स्वत:चाच हात आहे..

Monday, November 29, 2010

माथेरानची शोभा

स्वच्छ निर्मळ हवेत खुलते निसर्गाची आभा,
लोभवते आपल्याला ही माथेरानची शोभा..

खोलवर दरी इथे तिन्ही बाजूंना वसलेली,
हिरवीगार राई तिथे चौफेर पसरलेली..

कडेकपारीतुन खळ्खळुन हसणारे पाणी,
थक्क होतं मन ऐकुन ती निसर्गवाणी..

लांबुन दरीमध्ये दिसतं एक तळं छोटसं,
आपल्याकडे पहात ते खुदकन् हसतं छानसं..

क्षितिजाच्या सीमेवर लालबुंद गोळा झुकलेला,
मावळतीला जाताना कसा रंग उधळुन गेला..

लाल-नारिंगी-सोनेरी, धवल-चंदेरी नि पिवळा,
निळ्या निळ्या आकाशी असा रंगांचा रम्य सोहळा..

या निसर्गाला भरुन घ्यावं मनाच्या कवेत,
उतरवावं ते सौंदर्य मग एखाद्या कवितेत..

Monday, November 22, 2010

Happy Marriage Anniversary Aho Aai Baba !!

ती निरागस ज्योत एका क्षणी मंद थरथरली,
वा-यासोबत आलेल्या चंदनाच्या सुवासाने भारावली..

दोघांनी मग शपथ घेतली सदा साथ रहाण्याची,
सर्वस्व अर्पण करण्याची तयारी होतीच दोघांची..

हळुच संसारात मग् संभाजी-शिवाजी अवतरले,
आनंदाचे पारडे ज्योतीचे मग पुर्णच खाली झुकले..

जीवापाड कष्ट करुन वाढवलं दोघांनी आपल्या मुलानां,
आपल्या हातावरचं स्वतःच्या पायावर उभं केलं त्यांना..

चौकटीच्या संसारात मग हळुच दोन कळ्या अवतरल्या,
आई-बाबांच्या प्रेमवर्षावात त्या ही सहज खुलल्या..

आमच्या घरात आता असतो प्रत्येक क्षण आनंदाचा,
कारण आशिर्वाद आहे घरावर आमच्या आई-बाबांचा..

घर आमचं जणु देवाचा प्रकाशमय गंधीत गाभारा,
नेहमी सुखी राहोत आई-बाबा, हिच प्रार्थना ईश्वरा..

Wednesday, September 29, 2010

प्रथम तुला पहाताना...

सखे आज उगवला बघ दिन सोनियाचा,
पहिला मी प्रथमच मुखडा माझ्या पिल्लाचा..

तुला पहाताना बाबांची पापणी मिटेना,
तुझी प्रत्येक हालचाल माझ्या मनातुन सरेना..

छोटुकली ही कळी कशी उलमते आहे आतल्या आत,
बाबा म्हणतात पिल्लु नाचतयं पोटातल्या पोटात..

तुझी heartbeat ऐकली, तुझं heart पाहिलं,
माझ्याच उरि तेव्हा किती धकधक झालं..

परत केव्हा दिसतील् ते एवलेशे हात-पाय,
कोकराला पहायला आतुर तुझी ही माय॥

Tuesday, August 17, 2010

गोड चाहुल पहिली...

ती गोड रेशमी संध्याकाळ गुलाबी झालर ल्याली होती,
कारण देवतांनी अलगद येउन ओटी माझी भरली होती..

गोड नाजुक रोपटं फुलेल आता माझ्या अंगणी,
कोणास ठाऊक काय असेल, मोगरा कि रातराणी..

हासु आणि मस्तीने आता माझं घर भरेल,
बाळाच्या लडिवाळ बोलण्याने ते ही सुखावेल..

शब्दानां गोंजारत जेव्हा पिल्लु लागेल बोलु,
ते ही म्हणतील, या गोडव्यात अर्थच विसरुन जाऊ..

किती स्वप्नं माझी मी आतापासुन रंगवतेय,
तुला मांडीवर घ्यायची मी खुप वाट पहातेय..

Thursday, November 5, 2009

बाबा

"दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीप खरेंनी लिहीलेलं आहे. या गाण्याला उत्तर म्हणून..

कोमेजलेल्या तुमच्या परीची सांगु का तुम्हाला कहाणी,
अस्वस्थ करतात तिला तिच्या बाबांच्या आठवणी..

बागेत कधी तिच्यासोबत लहान झालेले बाबा,
एखाद्या रविवारी picture दाखवणारे बाबा॥
घरी स्वतःच्या ताटातला अर्धा घास कमी करुन,
सगळे माझे हट्ट हसुन पुरवणारे बाबा..

झोपेतही जाणवायचा मला तो मायेचा स्पर्श,
आले बाबा या जाणीवेने मनी दाटलेला हर्ष..

कधी खेळला नसाल बाबा कदाचित माझ्यासोबत;
माझ्या भातुकलीच्या खेळात नेहमीच तुमचा घास होता॥
आई असेल जवळ जरी जेव्हा उभी रहायला शिकले,
दुरुन पहाणारा बाबाही तितकाच हवाहवासा होता..

जरी कमी दिली मला तुमची सोबत देवाने,
खुप सारं जगुन घेतलं मी तुमच्या सहवासात..
जगले ना मी आई सोबत तुमच्याच आठवणीने,
तुम्ही गेल्यानंतरच्या वीस वर्षांत..

लहानपण असेल माझं बाबा तुम्हाविना गेलं,
मी कशी शिकले, कशी खेळले॥ काहीच नाही तुम्हाला पाहता आलं..
पण आहे अजुन ही माझ्या मनात संस्कारधन तुम्ही दिलेलं,
सजवेन मी माझं आयुष्य तुमच्या आठवणींत भिजलेलं..