आठवते का तुला तुझी खोडकर लहानशी लेक,
मला तीच बनायचय परत एकदा आजचा दिवस एक..
तुला सतत दमवणारी, परेशान करणारी,
आपल्या मस्तीने तुझ्या नाकात दम भरणारी..
तू शिकवलेले धडे एका दमात गिरवणारी,
रात्री अंगठा चोखत तुझ्या कुशीत झोपणारी..
तुझा पदराला तोंड पुसत कधीच मोठी झाले मी,
तुझ्या लाडवांचा घास घेत अजून लहान राहिलीये मी..
आपल्या लेकीचे लाड पुरवणारी आई झाले आहे मी,
तरी कौतुकाच्या थापेसाठी तुझीच वाट पाहते मी..
आई तुझ्या हातांची चव नाही इथे कोठे चाखली,
तुझ्या आवाजातली तळमळ नाही कधी जाणवली..
तुझा मायेचा स्पर्श, तुझ्या हातांची मिठी,
वाट्टेल ते करेन मी फक्त तुझ्या आनंदासाठी..
नको मला काही दौलत, नको काही धन,
तूच माझी सारी माया, तूच माझे जीवन..
तुला तुझ्या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा,
तुझे आशीर्वाद सतत असावे हीच मनी इच्छा..
No comments:
Post a Comment