तुझ्या आठवणीत सारी दुनिया माझी भिजली..
अजूनही कानावर येते तुझी "तका" अशी साद,
जाणवतो अजूनही तो पाठीवर थोपटणारा हात..
आई रागवताना कशी तुझ्या मागे लपायचे मी,
दुधावरची साय बनून तुझ्या कुशीत शिरायचे मी..
आठवतो तो प्रेमळ चेहरा मला जेऊ घालतानाचा,
माझं उष्टं तोंड पुसणारा पदर तो तुझ्या साडीचा..
माझ्या कौतुकाची तुझी पत्रं अजूनही वाचते मी,
त्यातून अखंड सांडत असलेला तुझा आशीर्वाद घेते मी..
आईकडून ऐकते नेहमी मी आठवणी तुझ्या-तिच्या,
जपल्यात तिने एका अनमोल कोनाड्यात मनाच्या..
आईच्या त्या आठवणींत तू आहेस जिवंत अजून,
तिच्या हरेक अश्रूत सापडते तुझे हसू अजून..
जिथे आहेस आता तिथे खूप सुखी राहा माई,
आशीर्वाद देत राहील सदा आपली अंबेजोगाई..
No comments:
Post a Comment