दिवस गेले, महिने गेले, वर्षांमागून वर्षे गेली,
तुमच्या आठवणीनी तरी आजही मनात गर्दी केली…
सगळ्यांना आपापल्या बाबासोबत आनंदाने पाहताना
हळूच देवाकडे तुमच्या सुखासाठी मागणी केली…
लहानपण सगळं माझ्या नजरेसमोरून सरकलं,
डोळ्यातल्या पाण्यासोबत मनात हसू घेऊन आलं…
आई मला रागावतानाचा पडलेला चेहरा तुमचा,
आज कोणी रागवायला नसतानाही हवाहवासा वाटला…
माझ्या प्रत्येक यशामध्ये खुश झालेले माझे बाबा,
माझ्या प्रत्येक आजारात हमसून हमसून रडणारे बाबा…
मी दूर जाऊ नये म्हणून घरजावई आणायचं ठरवणारे बाबा,
असं म्हणता म्हणता स्वत:च दूर निघून गेलेले बाबा…
कितीही दूर असलात बाबा, तुमची आठवण अजून ताजी आहे,
तुमच्या संस्कारांची वात अजून मनात तेवती आहे…
अभिमान वाटेल माझा तुम्हाला, अशीच सदा वागेन मी,
तुमच्यासारखीच होईन मी, तुमचीच तर मुलगी आहे…
तुमच्या प्रत्येक शब्दाची जादू अजून कानात आहे,
तुमच्या हाताच्या स्पर्शाची माया अजून मनात आहे…
जन्मदात्याला विसरून मी जगेन तरी कशी सांगा,
तुमच्याच रक्ताची धार दौडते माझ्या तनुत आहे…
No comments:
Post a Comment