Monday, June 24, 2013

प्रिय तनु,

कशी अचानक आनंदलाट घेऊन आली हि सांज,
तुझे निरागस डोळे मला इथूनही दिसले आज…  
तुझ्यासंगे बोलताना सखे इतकी मोकळी झालेय मी, 
स्वप्नातही झुल्यांवर झुलणार आहोत आपण आज…   

तुझा आवाज, तुझा हसणं, माझ्या मनाला साद घालणं,
"मन्या" म्हणत हलकेच माझ्यातलं लहानपण जागवणं…  
कधी जिवलग मैत्रीण बनून तर कधी मोठी दि बनून, 
आपला हात माझ्या पाठीवर आश्वासक थोपटणं…  

सुखाचे दिवस तुझ्यासंगे दामदुप्पट होऊन जातात, 
दु:खी क्षण कसे आपल्या बोलण्यात विरघळतात…  
संकटं तर माझी तुझ्यासमोर यायला घाबरतात, 
आनंदघन गडे माझ्या चहुबाजूला बरसतात…  

तुझ्या माझ्या मैत्रीचा गंध असा दरवळतो, 
जणू देवाचा गाभारा मंद उदबत्तीने उजळतो…  
त्याला मी नत होते तेव्हा चमकून तो बघतो, 
कारण माझा बाप्पा मला नेहमी तुझ्याच रुपात दिसतो… 

No comments:

Post a Comment