खूप काही लिहावसं वाटतंय पण सुचत काहीच नाही...
भावना मनात दाटलेल्या पण ओठांवर काहीच उमटत नाही..
आज अचानक सरस्वती देवी का अशी रागवली माझ्यावर
तिच्या आशीर्वादांची चाहूल दूरवर कुठेच लागत नाही..
पाऊस पडतो आहे बेभान, मन असंच वारा वारा..
घेऊन येतंय मुठीत पकडून खाली पडलेल्या गारा..
कशाच्या धुंदीत इतकं गुंतलंय कळतच नाहीये
त्या इंद्रधनुच्या मागे सुसाट पळतंय सैरावैरा..
लहानपणीचे दिवस आठवून मग मन ही गेलं भूतकाळात..
शाळेतून परत येतानाचं भिजणं आणी रेनकोट मात्र दप्तरात..
ओलीचिंब छकुली पाहून मग आईचं खोटा खोटा राग-रुसवा
जो बुडून जायचा चहाच्या एका गरम गरम घोटात..
मैत्रिणींसोबत भिजतानाची आठवली ती मस्ती..
होस्टेलच्या अंगणात जेव्हा एखादी कोकीळ गाणे गाती..
सुख-दु:खाच्या आठवणी एकमेकींकडे साठवताना
नकळत दिलेल्या वचनांनी जसे आज स्मरतात सोबती..
आज ही आहे तोच पाऊस, आजही कोकिळेचा आवाज आहे..
त्यातलं माधुर्य मात्र केव्हाच गळून गेलं आहे..
सख्यांना आठवता आठवता पाणावलेले डोळे
ते पुसायला ही आज फक्त स्वत:चाच हात आहे..
No comments:
Post a Comment