कधी कोणी माझं ही असेल
माझ्यावर जीव ओवाळून टाकेल,
मावळतीची गोंडस लाली
माझ्या भाळी चढवेल...
गळ्यात माझ्याही कधी
सौभाग्यलेणं असेल,
लाल तो सिंदुर कधी
माझा चेहरा सजवेल...
हातात माझ्या ही कधी
असेल चुडा हिरवागार,
सुखाचं दान मग मी
हसत करेन स्वीकार...
नाजुक चंदेरी जोडव्यानीं
पावले माझी सजतील,
आंनंदाच्या श्रावणधारा
माझ्याही अंगणी बरसतील...
इंद्रधनुषी रंगात
मी ही रंगेन तेव्हा,
पावसातही तेजवणारा
आदित्य साथी असेल जेव्हा...