अथश्री मधून परत येताना पावले जड झाली होती. आजी-आजोबांची पायधूळ घेताना पापणी जड झाली होती.. पंधरा दिवसांपूर्वीच ठेवलं होतं दोघांना या आश्रमात.. त्यांच्या डोळ्यात पहायची पण हिम्मत नव्हती माझ्या मनात.. पण का कोण जाणे.. त्यांच्या ओठांवर मात्र काहीच प्रश्न नव्हते.. कसलीच शिकायत नव्हती.. उलट आशीर्वाद होते.. आयुष्यभर या दोघांनी आपलं चांगलच चिंतलं.. कित्ती त्रास द्यायचो आपण लहानपणी.. पूर्ण घराण्यात "सगळ्यात खोडकर कोण?" या प्रश्नाला डोळे-कान बंद करून नुकतच बोलू लागलेलं शेम्बडं पोर पण सांगेल -- प्लाजत्ता.. अशा खोडकर स्वारीला सांभाळणं फार जिकिरीचं काम असायचं. पण ही दोघं.. देवमाणसं.. सांभाळलं दोघांनी मला.. ते ही कधी न रागवता.. आई चिडायची माझ्या खोड्यांनी कधी कधी !! पण आजी मात्र हळूच जवळ येउन लाडू द्यायची तोंडात.. आणि आईला म्हणायची, "नको गं लेकराला रागे भरूस.. दुधावरची साय आहे माझी ती !!"
काय झालय आज आपल्याला.. खरचच मन खूप अस्वस्थ झालय. सुचेनासं झालाय काहीच. असं वाटतंय कि सगळे बंधनं झुगारून देऊन स्वतंत्र व्हावं आणि मनाला येईल तसं आयुष्य जगावं. जे केलं नाही अल्लड वयात, भावनेच्या भरात, उनाड मस्तीत.. ते सगळं आता शांतपणे करावं. "मी आईचा मुलगा आहे" असा नुसतं घोकण्यापेक्षा तसं करून दाखवावं..
नवीन नवीन नोकरी लागली तेव्हा.. वाट्टेल तसे पैसे खर्च केले.. पार्ट्या केल्या.. भरगच्च फ्रेंड्स, होस्टेल, विकली पिकनिक्स, मुव्हीज.. एक ना अनेक.. खुप्प मज्जा केली त्या दिवसांत. काहीच कल्पना नव्हती खऱ्या आयुष्याची. जीवनाला काही दिशाच नव्हती तेव्हा. बारावी नंतर कम्प्युटर विषय घ्यावा कि नाही हे जिला बारावी चा निकाल लागला तरी कळत नव्हतं.. अशा मला काय सिरियसनेस असणार आयुष्याचा.. ही सगळी मज करताना एकदा पण नाही जाणवलं कि या मजेपुढेही काही आयुष्य आहे.. ज्यात खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. आधी त्या पार पडून मग नवीन जबाबदाऱ्यासाठी स्वत:ला मुक्त करायचं आहे.. त्या आधीच पुढचं स्टेशन आलं तर ही वेळ निघून जाईल. हातात काहीच नाही उरणार.. उरेल फक्त एक उसासा.. आणि फक्त एक आसू.. तो ही खालमानेनं निसटेल हळूच..
आता विचार करते तेव्हा वाटतं.. तेव्हाच्या माझ्या सगळ्या फ्रेंड्सना कळत होत्या या सगळ्या जबाबदाऱ्या.. मीच फक्त अशी होते.. स्वप्नांच्या जगात वावरणारी.. पऱ्यांच्या दुनियेत रमणारी.. अनादी, स्वच्छंद.. खरं सांगायचं झालं तर मूर्ख ! तेव्हाच जर मी ही शहाणी असते, स्वत:चं लाईफ़, फ्रेंड्स, इमोशन्स अशा आत्मकेंद्रित आयुष्यातून सुटून भविष्याकडे पाऊल टाकलं असतं.. लग्न का ठरत नाहीये अशा गोष्टीसाठी रडण्यापेक्षा आत्ताच्या क्षणाला निसटू दिलं नसतं.. पुढच्या स्टेशनची वाट पाहण्यापेक्षा आत्ताचं स्टेशन चुकवलं नसतं.. तर आज माझ्या आई-बाबांसाठी हक्काचं निवासस्थान असतं.. एक हक्काचं घर बांधता आलं असतं.. आणि आज मी गर्वाने माझ्या भूतकाळाला आणि वर्तमानालाही सांगू शकले असते, "Hey there, just dare!!"
आज त्या घरात माझे आई-बाबा, आजी-आजोबा.. सगळे सुखात राहिले असते.. स्वत:च्या घरात राहिले असते.. अथश्री चा आधार नसता लागला मग माझ्या कुटुंबाला. स्वत:च्या हातावरचं माझ्या पायांवर उभं केलं मला आईने.. आत्मसन्मानाने जगायला शिकवलं मला आईने.. नोकरी करण्याइतपत समंजस, स्वावलंबी आणी हुशार घडवलं मला आईने.. आणि जेव्हा हे सगळं झालं, तेव्हा मात्र स्वत:च्या पायावर उभं राहून पण माझे हात मोकळे नाहीयेत याच लोकांना आधार द्यायला.. त्यांची काठी मला आश्रमात सापडते आहे.. माझ्या घरात नाही..
"आई, what are you thinking about? am calling you like crazy!!" तानी हाक मारत होती. अरे.. घर आलं पण. इतका वेळ चालत आलो आपण. पाय दुखले नाहीत? कसे दुखतील.. आजीने लहानपणी मालीश नव्हतं का केलं त्यांना. विषण्ण मनानं हसले मी! माझं तसं हसणं आणी माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून तानी घाबरली.. ते बिचारं छोटं कोकरू मला बिलगून म्हणालं, "काय झालं मम्मा? माझं काही चुकलं का?" तिला घट्ट मिठी मारत मी म्हटलं, "नाही रे राजा.. तुझं नाही.. माझं चुकलंय. ती चूक सुधारण्याची वेळी निघून गेलीये आता.." तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मला सांगून गेलं कि तिला काहीच कळलं नव्हतं. मी तिला इतकच म्हटलं, "आजी-आजोबांची आठवण येतेय मला.." आणी तानी एका सेकंदात म्हणाली, "आई, you don't worry at all.. मी कमवायला लागले ना, कि आपण नक्की आणू ग्रेट आजी-आजोबांना आपल्या घरी.." त्या क्षणी तानी मध्ये मला माझं बालपण दिसलं. असं वाटलं, बाप्पाने परत तानीइतकच लहान करावं आपल्याला.. म्हणजे आज तानीला जे समजतंय, ते मलाही त्याच वयात समजेल आणी परत कधीच हे स्टेशन चुकणार नाही..