Friday, December 28, 2018

असा होता माझा दादामामा !!!

होता सगळ्यात मोठा पण खेळताना जसा माझाच दादा 
म्हणायचा मला गमतीने "पराजकता कि फिजक्ता"... 
मी चिडले कि मनसोक्त हसायचा माझा मामा 
ऐकून माझं उत्तर "दादामामा कि फिदामामा" !!!

सगळे सुखाचे सोबती असतात असं ऐकलं होतं,
मामाच्या बाबतीत मात्र हे सपशेल खोटं होतं..
माझ्या आणि आईच्या सगळ्याच दुःखी क्षणांमध्ये 
मामाच्या साथीचं पागडं तेवढं भारी होतं... 

बाबा होते तेव्हाही आणि बाबा नव्हते तेव्हाही,
मामाचा आधारवड नेहमीच आमच्या सोबत होता...
दैवाने साथ दिली नसली म्हणून काय झालं, 
आईचा दादा सततच आमच्या पाठीशी होता.. 

हॉस्पिटल असो, छोटं गाव असो, घर आम्हाला असो-नसो. 
नशिबाच्या साथी साठी रोज वणवण भटकंती असो. 
आईच्या माझ्यासवे एकटीने जगण्याच्या खटाटोपात 
कितीक सामोरलेल्या संकटांच्या दुतर्फा रांगा असो... 

आमच्यासाठी आमचा देव तोच एक होता 
ज्याच्या मदतीने आम्ही स्वतःला सावरायला शिकलो... 
आम्हाला पकडून धरलेला तोच खंबीर हात होता 
ज्याच्या साहाय्याने आम्ही परत जगायला शिकलो... 

काळ गेला,दुःख सरलं, मामाची माया नाही सरली... 
बाबांच्या प्रत्येक वर्ष-दिवशी ती ओसंडून वाहिली...
बाबा नसले तरी तुझ्या पाठीशी तुझा मामा आहे सर्वदा 
त्या एका आवाजाने मला नेहमीच हि जाणीव दिली... 

एका वर्षी असा फोन आला नाही म्हणून कारण विचारलं,
आता तुझ्या आयुष्यात दुःखाची जागा नाही असं उत्तर मिळालं...
माझ्या लग्नाच्या दिवशी भरभरून आशीर्वाद देताना 
त्याच्या डोळ्यातलं पाणी माझ्यासाठी सुख सांडून गेलं... 

अमेरिकेत होते तेव्हा माझ्यापेक्षा मामाच जास्त खुश होता, 
पृथ्वीवरच्या स्वर्गात आहेस असं कौतुकाने म्हणाला होता... 
जगात देव आहे कि नाही मला खरंच माहित नाही, 
माझ्या आणि आई साठी मात्र हाच एक देवात्मा होता !!!

-- प्राजक्त 
२८-डिसेंबर-२०१८