Saturday, September 1, 2012

चुकलेलं स्टेशन !

अथश्री मधून परत येताना पावले जड झाली होती. आजी-आजोबांची पायधूळ घेताना पापणी जड झाली होती.. पंधरा दिवसांपूर्वीच ठेवलं होतं दोघांना या आश्रमात.. त्यांच्या डोळ्यात पहायची पण हिम्मत नव्हती माझ्या मनात.. पण का कोण जाणे.. त्यांच्या ओठांवर मात्र काहीच प्रश्न नव्हते.. कसलीच शिकायत नव्हती.. उलट आशीर्वाद होते.. आयुष्यभर या दोघांनी आपलं चांगलच चिंतलं.. कित्ती त्रास द्यायचो आपण लहानपणी.. पूर्ण घराण्यात "सगळ्यात खोडकर कोण?" या प्रश्नाला डोळे-कान बंद करून नुकतच बोलू लागलेलं शेम्बडं पोर पण सांगेल -- प्लाजत्ता.. अशा खोडकर स्वारीला सांभाळणं फार जिकिरीचं काम असायचं. पण ही दोघं.. देवमाणसं.. सांभाळलं दोघांनी मला.. ते ही कधी न रागवता.. आई चिडायची माझ्या खोड्यांनी कधी कधी !! पण आजी मात्र हळूच जवळ येउन लाडू द्यायची तोंडात.. आणि आईला म्हणायची, "नको गं लेकराला रागे भरूस.. दुधावरची साय आहे माझी ती !!"

काय झालय आज आपल्याला.. खरचच मन खूप अस्वस्थ झालय. सुचेनासं झालाय काहीच. असं वाटतंय कि सगळे बंधनं झुगारून देऊन स्वतंत्र व्हावं आणि मनाला येईल तसं आयुष्य जगावं. जे केलं नाही अल्लड वयात, भावनेच्या भरात, उनाड मस्तीत.. ते सगळं आता शांतपणे करावं. "मी आईचा मुलगा आहे" असा नुसतं घोकण्यापेक्षा तसं करून दाखवावं.. 

नवीन नवीन नोकरी लागली तेव्हा.. वाट्टेल तसे पैसे खर्च केले.. पार्ट्या केल्या.. भरगच्च फ्रेंड्स, होस्टेल, विकली पिकनिक्स, मुव्हीज.. एक ना अनेक.. खुप्प मज्जा केली त्या दिवसांत. काहीच कल्पना नव्हती खऱ्या आयुष्याची. जीवनाला काही दिशाच नव्हती तेव्हा. बारावी नंतर कम्प्युटर विषय घ्यावा कि नाही हे जिला बारावी चा निकाल लागला तरी कळत नव्हतं.. अशा मला काय सिरियसनेस असणार आयुष्याचा.. ही सगळी मज करताना एकदा पण नाही जाणवलं कि या मजेपुढेही काही आयुष्य आहे.. ज्यात खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. आधी त्या पार पडून मग नवीन जबाबदाऱ्यासाठी स्वत:ला मुक्त करायचं आहे.. त्या आधीच पुढचं स्टेशन आलं तर ही वेळ निघून जाईल. हातात काहीच नाही उरणार.. उरेल फक्त एक उसासा.. आणि फक्त एक आसू.. तो ही खालमानेनं निसटेल हळूच..

आता विचार करते तेव्हा वाटतं.. तेव्हाच्या माझ्या सगळ्या फ्रेंड्सना कळत होत्या या सगळ्या जबाबदाऱ्या.. मीच फक्त अशी होते.. स्वप्नांच्या जगात वावरणारी.. पऱ्यांच्या दुनियेत रमणारी.. अनादी, स्वच्छंद.. खरं सांगायचं झालं तर मूर्ख ! तेव्हाच जर मी ही शहाणी असते, स्वत:चं लाईफ़, फ्रेंड्स, इमोशन्स अशा आत्मकेंद्रित आयुष्यातून सुटून भविष्याकडे पाऊल टाकलं असतं.. लग्न का ठरत नाहीये अशा गोष्टीसाठी रडण्यापेक्षा आत्ताच्या क्षणाला निसटू दिलं नसतं.. पुढच्या स्टेशनची वाट पाहण्यापेक्षा आत्ताचं स्टेशन चुकवलं नसतं.. तर आज माझ्या आई-बाबांसाठी हक्काचं निवासस्थान असतं.. एक हक्काचं घर बांधता आलं असतं.. आणि आज मी गर्वाने माझ्या भूतकाळाला आणि वर्तमानालाही सांगू शकले असते, "Hey there, just dare!!"

आज त्या घरात माझे आई-बाबा, आजी-आजोबा.. सगळे सुखात राहिले असते.. स्वत:च्या घरात राहिले असते.. अथश्री चा आधार नसता लागला मग माझ्या कुटुंबाला. स्वत:च्या हातावरचं माझ्या पायांवर उभं केलं मला आईने.. आत्मसन्मानाने जगायला शिकवलं मला आईने.. नोकरी करण्याइतपत समंजस, स्वावलंबी आणी हुशार घडवलं मला आईने.. आणि जेव्हा हे सगळं झालं, तेव्हा मात्र स्वत:च्या पायावर उभं राहून पण माझे हात मोकळे नाहीयेत याच लोकांना आधार द्यायला.. त्यांची काठी मला आश्रमात सापडते आहे.. माझ्या घरात नाही.. 

"आई, what are  you thinking about? am calling you like crazy!!" तानी हाक मारत होती. अरे.. घर आलं पण. इतका वेळ चालत आलो आपण. पाय दुखले नाहीत? कसे दुखतील.. आजीने लहानपणी मालीश नव्हतं का केलं त्यांना. विषण्ण मनानं हसले मी! माझं तसं हसणं आणी माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून तानी घाबरली.. ते बिचारं छोटं कोकरू मला बिलगून म्हणालं, "काय झालं मम्मा? माझं काही चुकलं का?" तिला घट्ट मिठी मारत मी म्हटलं, "नाही रे राजा.. तुझं नाही.. माझं चुकलंय. ती चूक सुधारण्याची वेळी निघून गेलीये आता.." तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मला सांगून गेलं कि तिला काहीच कळलं नव्हतं. मी तिला इतकच म्हटलं, "आजी-आजोबांची आठवण येतेय मला.." आणी तानी एका सेकंदात म्हणाली, "आई, you don't worry at all.. मी कमवायला लागले ना, कि आपण नक्की आणू ग्रेट आजी-आजोबांना आपल्या घरी.." त्या क्षणी तानी मध्ये मला माझं बालपण दिसलं. असं वाटलं, बाप्पाने परत तानीइतकच लहान करावं आपल्याला.. म्हणजे आज तानीला जे समजतंय, ते मलाही त्याच वयात समजेल आणी परत कधीच हे स्टेशन चुकणार नाही.. 

Wednesday, August 15, 2012

वरणफळं

रात्रीची वेळ होती. जेवण वैगेरे सगळं आटोपून शतपावल्या करण्यासाठी ती गैलरी मध्ये आली. तसं आज सकाळपासूनच तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. मुलीचा आवाज ऐकायची ओढ लागली होती. गैलरीतल्या आरामखुर्चीत बसल्या बसल्या ती विचार करत राहिली. कसं गेलं आपलं आयुष्य.. सगळं मुलीच्या मागे.. तिचा अभ्यास, तिची शाळा, तिची स्पर्धा, स्पर्धेची तयारी, वाढदिवस.. एक ना अनेक.. सगळं नाचतंय आज डोळ्यांसमोर एक एक करत. मुलगी म्हणजेच आपलं आयुष्य होतं. तिच्यासाठीच प्रत्येक क्षण वेचला, प्रत्येक सुखाचा अंकुर तिच्यासाठी सांभाळून ठेवला. वाट्याला आलेलं दु:ख मात्र एकटीने सहन केलं. मुलीच्या केसालाही त्या आगीची झळ लागू दिली नाही.. स्वतः कामाचे रगाडे हाकत मुलीला आरामात वाढवलं. आज मुलगी मोठी झालीये, चांगली शिकलीये, नोकरीला लागलीये.. लग्न झालंय आणि आपल्याला छानशी नात पण झालीये.. पण ती सगळी आहेत मात्र लांब. सातासमुद्रापार.. लहानपणी इतकं करताना पण मन आणि शरीर थकायचं म्हणून नाही.. आणि आज.. काहीच न करता का असा थकवा येतोय? मुलगी लांब असल्याचं का सारखंच जाणवतंय? डोळे टचकन का भरून येताहेत..? बंद डोळ्यांना नातीला कडेवर घेतलेली आपली लेकच दिसतेय सारखी.

वरणफळं.. आज जेवायला वरणफळं केले होते. किती आवडतात मुलीला.. प्रत्येक वेळी नोकरीला पुण्याला असताना घरी यायची सुट्टी घेऊन तेव्हा तिला वरणफळंच लागायची जेवायला. आपण म्हणायचो, "अगं छान करते काहीतरी.. पुरणाची पोळी करते, बटाटेवडे करते.. तरी तिचं एकच पालुपद.. "तू ते सगळं नंतर कधी तरी कर गं.. आल्या आल्या मला गरमागरम वरणफळं हवीत ताटात.." आणि वरणफळं खाता खाता आमच्या गप्पांना सुरवात व्हायची.. माझं मन त्या गप्पांकडे कमी आणि तिच्या वरणफळं खात असलेल्या समाधानी चेहऱ्यातच जास्त गुंतायचं.. सकाळपासूनच्या सगळ्या श्रमांचा चीज व्हायचं. आता येत असतो तिचा फोन कधी कधी.. खूप खुश असते मुलगी.. नातीचं कौतुक सांगते, आपल्या तब्येतीची चौकशी करते.. पण तरी काहीसं अधुरं-अधुरंच वाटतं.. असं वाटतं.. अचानक समोर येऊन गळ्यात पडेल आणि म्हणेल, "आई, अशी काय बसलीयेस? जेवलीस की नाही? मला वरणफळं करून दे आताच्या आता.. " आणि इतकी थकून सुद्धा मी नव्या जोमाने उठून करायला घ्यावेत वरणफळं.. 

आपल्या प्रत्येक वाढदिवसाला असायची ती आपल्यासोबत.. नात होईपर्यंत तिचा हा क्रम काही चुकला नव्हता.. सोबत रामाला जायचो आम्ही.. माझ्या वाढदिवसाला पण तिलाच काहीतरी नवीन घ्यायचे मी.. स्वत:ला नवीन घेऊन घालण्याच्या आनंदापेक्षा तिच्या अंगावरचा नवीन ड्रेस जास्त भावायचा मनाला.. 

इवल्याश्या आपल्या लाडकीला घेऊन नवी-नवी आई बनून घरी आली होती माझी लाडकी.. आई झाल्यावरचे सगळे रंग तिला हळू हळू कळायला लागले होते.. लहान असताना मी काळजी करायचे खूप म्हणून चिडायची माझ्यावर.. आता तिचा काळजी करायचा टप्पा सुरु झाला होता.. आता आम्ही माय-लेकींपेक्षा जास्त मैत्रिणी झालो होतो.. माझी दगदग तिला हळू हळू समजायला लागली होती.. ती दूर असतानाची माझ्या मनाची तडफड जाणवायला लागली होती तिला.. 

अशातच मग एकदा जावयाच्या लांबच्या नोकरीचा निरोप आला.. जायच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी रात्रभर जगलोत.. खूप गप्पा मारल्या.. माझ्या लहानपणापासूनच्या तर नातीच्या बालपणाच्या.. होत्या-नव्हत्या सगळ्या आठवणी, सगळं सुख, सगळं हसणं, सगळं जगणं त्या एका रात्रीत जागून घेतलं.. शेवटी मात्र दोघी अगदी गळ्यात गळे घालून रडलोत.. मनसोक्त झोकून दिला स्वत:ला एकमेकींच्या कुशीत.. असं वाटलं मिठी इतकी घट्ट करावी की मुलीला ती सोडताच येऊ नये.. आणि ती लांब जाऊच नये.. पण.. सुटली मिठी.. गेलं माझं कोकरू सातासमुद्रापार.. 

अरे आली का मुलगी? ये की गं कुशीत माझ्या.. जवळ बैस माझ्या.. किती काळाच्या गप्पा मारायाच्यात तुझ्याशी.. किंवा गप्पा पण नको.. तुझा स्पर्श मला जाणवत राहू देत फक्त असाच! माझ्या जगण्यात तुझं असणं हीच एक आस आहे.. तुझ्या प्रत्येक हसण्यात माझा एक-एक श्वास आहे.. तुझी वाट पाहणं हाच मनी ध्यास आहे.. तू खरंच आलीयेस का हा माझा भास आहे?

अरे, बराच वेळ झाला नाही आपण इथे खुर्चीत बसलोय.. कसला विचार करतोय.. दिवास्वप्न होतं बहुतेक.. आता इतक्यात काही लेक येणार नाही घरी.. फोन पण येऊन गेला आहे परवा.. आज नाही यायचा.. गडबडीत असेल स्वयंपाकाच्या.. असा विचार करून ती परत बसली खुर्चीत.. तेवढ्यात फोन वाजला.. रिंग रिंग.. इतक्या रात्री फोन करणाऱ्याला शिव्या देत थकल्या पावलांनी तिने सावकाश जात फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला,
"आई, अशी काय बसलीयेस? जेवलीस की नाही? मला वरणफळं करून दे आताच्या आता.. आणि फोनवर काय बोलतीयेस? दरवाजा उघड.. मी आहे बाहेर.. "

Monday, August 13, 2012

आठवणी.. चिंब ओल्या..

खूप काही लिहावसं वाटतंय पण सुचत काहीच नाही...
भावना मनात दाटलेल्या पण ओठांवर काहीच उमटत नाही..
आज अचानक सरस्वती देवी का अशी रागवली माझ्यावर
तिच्या आशीर्वादांची चाहूल दूरवर कुठेच लागत नाही..

पाऊस पडतो आहे बेभान, मन असंच वारा वारा..
घेऊन येतंय मुठीत पकडून खाली पडलेल्या गारा..
कशाच्या धुंदीत इतकं गुंतलंय कळतच नाहीये
त्या इंद्रधनुच्या मागे सुसाट पळतंय सैरावैरा..

लहानपणीचे दिवस आठवून मग मन ही गेलं भूतकाळात..
शाळेतून परत येतानाचं भिजणं आणी रेनकोट मात्र दप्तरात..
ओलीचिंब छकुली पाहून मग आईचं खोटा खोटा राग-रुसवा
जो बुडून जायचा चहाच्या एका गरम गरम घोटात..

मैत्रिणींसोबत भिजतानाची आठवली ती मस्ती..
होस्टेलच्या अंगणात जेव्हा एखादी कोकीळ गाणे गाती..
सुख-दु:खाच्या आठवणी एकमेकींकडे साठवताना
नकळत दिलेल्या वचनांनी जसे आज स्मरतात सोबती..

आज ही आहे तोच पाऊस, आजही कोकिळेचा आवाज आहे..
त्यातलं माधुर्य मात्र केव्हाच गळून गेलं आहे..
सख्यांना आठवता आठवता पाणावलेले डोळे
ते पुसायला ही आज फक्त स्वत:चाच हात आहे..