Monday, July 13, 2009

रे सख्या॥

तुझ्या माझ्या नात्याला
काय देऊ मी नाव?
नवरा-बायको आहोतच रे
तरी थोडा वेगळा भाव॥

तुझाच विचार करते मी
आज-काल हरेक क्षणी,
तु असताना रंगलेल्या गप्पा;
अन् एरवी तुझ्या आठवणी॥

आयुष्यातलं मोठं वळण -
नवं नातं, नवी जवळीक,
थांब रे सख्या जरासा;
येइल कशी लगेच मोकळीक॥

तुझ्यासारखा जोडीदार मिळाला,
खरच माझं सौभाग्य आहे..
तुझ्याचमुळे माझ्या जीवनात
गर्भरेशमी हिरवळ आहे॥

चुकले मी वागण्यात कधी
माफ करशील ना मला?
झालं-गेलं सगळं विसरुन
जवळं घेशील ना मला?

साथ देईन मी तुला
अशीच चालेन संगतीने,
तुही असाच राहशील ना
पाठीशी माझ्या हिमतीने?

Tuesday, September 2, 2008

एका त्या क्षणी...

भेटलास एका त्या क्षणी असा
सारी स्वप्नं जागी झाली,
नाजुक हळव्या ओंजळीने
तुलाच भरुन घ्यायला लागली...

बोललास एका त्या क्षणी असा
वाटलं जग इथेच थांबावं,
वा-यानेही किंचित मान वळवुन
आपल्या मनीचं गुजं जाणावं...

हसलास एका त्या क्षणी असा
प्राजक्ताचा सडा अगंणी पडला,
तुझ्यासह जोडीने फ़िरताना
त्याचाच घमघमाट जाणवला...

हसवलसं एका त्या क्षणी असं
डोळ्यातलं पाणी उडुन गेलं,
तुझ्या मायेच्या शब्दांनी
ते ही घाबरुन पळुन गेलं..

होशील माझा एका त्या क्षणी असा
मी सर्वांगी मोहरुन जाईन,
सुखाच्या मोरपीसावरुन फ़िरताना
तुझ्या संसारात रंगुन जाईन...

Tuesday, April 22, 2008

जुळावेत रेशीमबंध...

कशी लागली ही हुरहूर जीवा
मनात माझ्या कसला गंध?
वाटे असावं असं कोणी ज्यासवे
जुळावेतं हळुवार रेशीमबंध...

झोक्यावर बसून कधी
वाटे हवेत उंच विहरावं
दुरून आलेल्या सुगंधानं
निमिषभर सर्वांग मोहरावं...

सळसळ हिरव्या पानांची
कानी गुजगोष्टी बोलून जाते
फुलपाखरांच्या रंगात
मी अलगद बुडुनि जाते...

क्षितीजाच्या पलीकडे
चोरून नजर काय शोधते
अजाण वाटेकडे उगाच
वेड्यागत डोळे लावून बसते...

पुसटशी येते कधी
नेत्रांत अश्रूंची लाट
स्वप्नातल्या त्याची
बघेन आजन्म वाट...

Saturday, March 8, 2008

Happy Women's Day !!

जिजाऊंसारखी आई ही आमच्यातलीच एक आहे
सीतेसारखी पातिव्रताही आमच्यातलीच एक आहे
सीता, जिजाऊंसारख्या प्रबळ महाशक्तींसम
कल्पना चावला ही आमच्यातलीच एक आहे

निर्भय, आत्मविश्वासू अशी मानिनी
सर्व जगात आघाडीवर आहे
राणी लक्ष्मीबाईंची शूरतेसम
किरण बेदी ही आमच्यातलीच एक आहे

नात्यांच्या रेशीमबंधात गुंफलेली स्त्री
म्हणते मऊ उबदार लोकर आहे
अमाप ममतेच्या प्रतिकृतीसम
मदर तेरेसा ही आमच्यातलीच एक आहे

लता-अशा च्या कोमल स्वरांनी
आज जग झंकारले आहे
राधा-मीराच्या प्रेमाच्या रूपाने
कविताही नि:शब्द होते आहे

बहिणाबाईंच्या ओव्यांमधला अर्थ
आज जगाला कळला आहे
देवही झुकला अशा सावित्रीसम
जनाबाई ही आमच्यातलीच एक आहे

नित्य नवे ध्येय मनी
ज्यांची महत्वाकांक्षा असीम आहे
गार्गी-मैत्रेयी या विद्द्युलतेसम
आनंदी जोशी ही आमच्यातलीच एक आहे

जितकी सबळ आहे हि स्वामींनी
मनात खुळखुळणारा झरा आहे
सागराकडे झेप घेणाऱ्या सरितेसम
दुष्यन्ताची शकुंतला ही आमच्यातलीच एक आहे

तुमच्या माझ्या प्रत्येकात
ही बंदिनी लपलेली आहे
अशा सर्व थोर स्त्रियांना
हि प्राजक्ता वंदन करते आहे





Wednesday, March 5, 2008

जादू निसर्गाची

अस्ताला जाता रवी धरेवर झेपावणारी संध्या,
हिरवा निसर्ग पाहता पाहता गाली खुद्कन हसणारी मुग्धा...

प्रियेच्या गालावरती जसा लज्जेचा रक्तीमा,
तशीच भासे मला ही लालजर्द पश्चिमा...

शांत शीतल प्रकाशाने सुखावतात नेञ,
हळुच निरोप घेतो जेव्हा धरतीचा मिञ...

सुर्यास्त प्रतिबिंबित झालेल्या पाण्यावर हलकेसे तरंग,
नाजुकशी ती रंगछटा अन् मनात कसलेसे उमंग...

चांदण्यांनी झुळकावली निशेच्या येण्याची चाहुल,
राजेशाही थाटातलं चंद्राचं पहिलं पाउल...

निसर्गाची ही जादु पाहुन प्राजक्ता ही बहरली,
अफ़ाट असं सौन्दर्य निरखत मनोमन मोहरली...

Thursday, December 20, 2007

कधी कोणी

कधी कोणी माझं ही असेल
माझ्यावर जीव ओवाळून टाकेल,
मावळतीची गोंडस लाली
माझ्या भाळी चढवेल...

गळ्यात माझ्याही कधी
सौभाग्यलेणं असेल,
लाल तो सिंदुर कधी
माझा चेहरा सजवेल...

हातात माझ्या ही कधी
असेल चुडा हिरवागार,
सुखाचं दान मग मी
हसत करेन स्वीकार...

नाजुक चंदेरी जोडव्यानीं
पावले माझी सजतील,
आंनंदाच्या श्रावणधारा
माझ्याही अंगणी बरसतील...

इंद्रधनुषी रंगात
मी ही रंगेन तेव्हा,
पावसातही तेजवणारा
आदित्य साथी असेल जेव्हा...

Monday, November 5, 2007

माझे बाबा...

होता माझ्याकडेही कधी काळी एक चांदोबा,
शांत निर्मळ प्रेमाचा सागर असलेले माझे बाबा...

सीमोलघंन करुन आल्यावर आम्हाला ओवाळणारी आई,
आमच्या कुटुंबावर सदा वरदहस्त ठेवणारी अम्बेजोगाई...

छानसं सजलेलं होतं आमचं छोटसं घरकुल,
आई-बाबांच्या संसारवेलीवरचं मी प्राजक्ताचं फ़ुल...

निरभ्र आकाश निमिषात झाकोळावं तशी अवचित द्रुष्ट लागली,
भर दुपारी आईची किंकाळी ह्रुदयाला चिरा पाडत गेली...

अफ़ाट जगात आम्हाला सोडुन बाबा दुर निघुन गेले,
प्रेम करण्याची दैवी देणगी जाताना माझ्यात रुजवून गेले...

त्यांनी केलेले संस्कार मी आजन्म जपणार आहे,
त्यांची निशाणी - ही कळी मी जीवनभर फ़ुलवणार आहे...