Wednesday, August 15, 2012

वरणफळं

रात्रीची वेळ होती. जेवण वैगेरे सगळं आटोपून शतपावल्या करण्यासाठी ती गैलरी मध्ये आली. तसं आज सकाळपासूनच तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. मुलीचा आवाज ऐकायची ओढ लागली होती. गैलरीतल्या आरामखुर्चीत बसल्या बसल्या ती विचार करत राहिली. कसं गेलं आपलं आयुष्य.. सगळं मुलीच्या मागे.. तिचा अभ्यास, तिची शाळा, तिची स्पर्धा, स्पर्धेची तयारी, वाढदिवस.. एक ना अनेक.. सगळं नाचतंय आज डोळ्यांसमोर एक एक करत. मुलगी म्हणजेच आपलं आयुष्य होतं. तिच्यासाठीच प्रत्येक क्षण वेचला, प्रत्येक सुखाचा अंकुर तिच्यासाठी सांभाळून ठेवला. वाट्याला आलेलं दु:ख मात्र एकटीने सहन केलं. मुलीच्या केसालाही त्या आगीची झळ लागू दिली नाही.. स्वतः कामाचे रगाडे हाकत मुलीला आरामात वाढवलं. आज मुलगी मोठी झालीये, चांगली शिकलीये, नोकरीला लागलीये.. लग्न झालंय आणि आपल्याला छानशी नात पण झालीये.. पण ती सगळी आहेत मात्र लांब. सातासमुद्रापार.. लहानपणी इतकं करताना पण मन आणि शरीर थकायचं म्हणून नाही.. आणि आज.. काहीच न करता का असा थकवा येतोय? मुलगी लांब असल्याचं का सारखंच जाणवतंय? डोळे टचकन का भरून येताहेत..? बंद डोळ्यांना नातीला कडेवर घेतलेली आपली लेकच दिसतेय सारखी.

वरणफळं.. आज जेवायला वरणफळं केले होते. किती आवडतात मुलीला.. प्रत्येक वेळी नोकरीला पुण्याला असताना घरी यायची सुट्टी घेऊन तेव्हा तिला वरणफळंच लागायची जेवायला. आपण म्हणायचो, "अगं छान करते काहीतरी.. पुरणाची पोळी करते, बटाटेवडे करते.. तरी तिचं एकच पालुपद.. "तू ते सगळं नंतर कधी तरी कर गं.. आल्या आल्या मला गरमागरम वरणफळं हवीत ताटात.." आणि वरणफळं खाता खाता आमच्या गप्पांना सुरवात व्हायची.. माझं मन त्या गप्पांकडे कमी आणि तिच्या वरणफळं खात असलेल्या समाधानी चेहऱ्यातच जास्त गुंतायचं.. सकाळपासूनच्या सगळ्या श्रमांचा चीज व्हायचं. आता येत असतो तिचा फोन कधी कधी.. खूप खुश असते मुलगी.. नातीचं कौतुक सांगते, आपल्या तब्येतीची चौकशी करते.. पण तरी काहीसं अधुरं-अधुरंच वाटतं.. असं वाटतं.. अचानक समोर येऊन गळ्यात पडेल आणि म्हणेल, "आई, अशी काय बसलीयेस? जेवलीस की नाही? मला वरणफळं करून दे आताच्या आता.. " आणि इतकी थकून सुद्धा मी नव्या जोमाने उठून करायला घ्यावेत वरणफळं.. 

आपल्या प्रत्येक वाढदिवसाला असायची ती आपल्यासोबत.. नात होईपर्यंत तिचा हा क्रम काही चुकला नव्हता.. सोबत रामाला जायचो आम्ही.. माझ्या वाढदिवसाला पण तिलाच काहीतरी नवीन घ्यायचे मी.. स्वत:ला नवीन घेऊन घालण्याच्या आनंदापेक्षा तिच्या अंगावरचा नवीन ड्रेस जास्त भावायचा मनाला.. 

इवल्याश्या आपल्या लाडकीला घेऊन नवी-नवी आई बनून घरी आली होती माझी लाडकी.. आई झाल्यावरचे सगळे रंग तिला हळू हळू कळायला लागले होते.. लहान असताना मी काळजी करायचे खूप म्हणून चिडायची माझ्यावर.. आता तिचा काळजी करायचा टप्पा सुरु झाला होता.. आता आम्ही माय-लेकींपेक्षा जास्त मैत्रिणी झालो होतो.. माझी दगदग तिला हळू हळू समजायला लागली होती.. ती दूर असतानाची माझ्या मनाची तडफड जाणवायला लागली होती तिला.. 

अशातच मग एकदा जावयाच्या लांबच्या नोकरीचा निरोप आला.. जायच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी रात्रभर जगलोत.. खूप गप्पा मारल्या.. माझ्या लहानपणापासूनच्या तर नातीच्या बालपणाच्या.. होत्या-नव्हत्या सगळ्या आठवणी, सगळं सुख, सगळं हसणं, सगळं जगणं त्या एका रात्रीत जागून घेतलं.. शेवटी मात्र दोघी अगदी गळ्यात गळे घालून रडलोत.. मनसोक्त झोकून दिला स्वत:ला एकमेकींच्या कुशीत.. असं वाटलं मिठी इतकी घट्ट करावी की मुलीला ती सोडताच येऊ नये.. आणि ती लांब जाऊच नये.. पण.. सुटली मिठी.. गेलं माझं कोकरू सातासमुद्रापार.. 

अरे आली का मुलगी? ये की गं कुशीत माझ्या.. जवळ बैस माझ्या.. किती काळाच्या गप्पा मारायाच्यात तुझ्याशी.. किंवा गप्पा पण नको.. तुझा स्पर्श मला जाणवत राहू देत फक्त असाच! माझ्या जगण्यात तुझं असणं हीच एक आस आहे.. तुझ्या प्रत्येक हसण्यात माझा एक-एक श्वास आहे.. तुझी वाट पाहणं हाच मनी ध्यास आहे.. तू खरंच आलीयेस का हा माझा भास आहे?

अरे, बराच वेळ झाला नाही आपण इथे खुर्चीत बसलोय.. कसला विचार करतोय.. दिवास्वप्न होतं बहुतेक.. आता इतक्यात काही लेक येणार नाही घरी.. फोन पण येऊन गेला आहे परवा.. आज नाही यायचा.. गडबडीत असेल स्वयंपाकाच्या.. असा विचार करून ती परत बसली खुर्चीत.. तेवढ्यात फोन वाजला.. रिंग रिंग.. इतक्या रात्री फोन करणाऱ्याला शिव्या देत थकल्या पावलांनी तिने सावकाश जात फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला,
"आई, अशी काय बसलीयेस? जेवलीस की नाही? मला वरणफळं करून दे आताच्या आता.. आणि फोनवर काय बोलतीयेस? दरवाजा उघड.. मी आहे बाहेर.. "

Monday, August 13, 2012

आठवणी.. चिंब ओल्या..

खूप काही लिहावसं वाटतंय पण सुचत काहीच नाही...
भावना मनात दाटलेल्या पण ओठांवर काहीच उमटत नाही..
आज अचानक सरस्वती देवी का अशी रागवली माझ्यावर
तिच्या आशीर्वादांची चाहूल दूरवर कुठेच लागत नाही..

पाऊस पडतो आहे बेभान, मन असंच वारा वारा..
घेऊन येतंय मुठीत पकडून खाली पडलेल्या गारा..
कशाच्या धुंदीत इतकं गुंतलंय कळतच नाहीये
त्या इंद्रधनुच्या मागे सुसाट पळतंय सैरावैरा..

लहानपणीचे दिवस आठवून मग मन ही गेलं भूतकाळात..
शाळेतून परत येतानाचं भिजणं आणी रेनकोट मात्र दप्तरात..
ओलीचिंब छकुली पाहून मग आईचं खोटा खोटा राग-रुसवा
जो बुडून जायचा चहाच्या एका गरम गरम घोटात..

मैत्रिणींसोबत भिजतानाची आठवली ती मस्ती..
होस्टेलच्या अंगणात जेव्हा एखादी कोकीळ गाणे गाती..
सुख-दु:खाच्या आठवणी एकमेकींकडे साठवताना
नकळत दिलेल्या वचनांनी जसे आज स्मरतात सोबती..

आज ही आहे तोच पाऊस, आजही कोकिळेचा आवाज आहे..
त्यातलं माधुर्य मात्र केव्हाच गळून गेलं आहे..
सख्यांना आठवता आठवता पाणावलेले डोळे
ते पुसायला ही आज फक्त स्वत:चाच हात आहे..

Monday, November 29, 2010

माथेरानची शोभा

स्वच्छ निर्मळ हवेत खुलते निसर्गाची आभा,
लोभवते आपल्याला ही माथेरानची शोभा..

खोलवर दरी इथे तिन्ही बाजूंना वसलेली,
हिरवीगार राई तिथे चौफेर पसरलेली..

कडेकपारीतुन खळ्खळुन हसणारे पाणी,
थक्क होतं मन ऐकुन ती निसर्गवाणी..

लांबुन दरीमध्ये दिसतं एक तळं छोटसं,
आपल्याकडे पहात ते खुदकन् हसतं छानसं..

क्षितिजाच्या सीमेवर लालबुंद गोळा झुकलेला,
मावळतीला जाताना कसा रंग उधळुन गेला..

लाल-नारिंगी-सोनेरी, धवल-चंदेरी नि पिवळा,
निळ्या निळ्या आकाशी असा रंगांचा रम्य सोहळा..

या निसर्गाला भरुन घ्यावं मनाच्या कवेत,
उतरवावं ते सौंदर्य मग एखाद्या कवितेत..

Monday, November 22, 2010

Happy Marriage Anniversary Aho Aai Baba !!

ती निरागस ज्योत एका क्षणी मंद थरथरली,
वा-यासोबत आलेल्या चंदनाच्या सुवासाने भारावली..

दोघांनी मग शपथ घेतली सदा साथ रहाण्याची,
सर्वस्व अर्पण करण्याची तयारी होतीच दोघांची..

हळुच संसारात मग् संभाजी-शिवाजी अवतरले,
आनंदाचे पारडे ज्योतीचे मग पुर्णच खाली झुकले..

जीवापाड कष्ट करुन वाढवलं दोघांनी आपल्या मुलानां,
आपल्या हातावरचं स्वतःच्या पायावर उभं केलं त्यांना..

चौकटीच्या संसारात मग हळुच दोन कळ्या अवतरल्या,
आई-बाबांच्या प्रेमवर्षावात त्या ही सहज खुलल्या..

आमच्या घरात आता असतो प्रत्येक क्षण आनंदाचा,
कारण आशिर्वाद आहे घरावर आमच्या आई-बाबांचा..

घर आमचं जणु देवाचा प्रकाशमय गंधीत गाभारा,
नेहमी सुखी राहोत आई-बाबा, हिच प्रार्थना ईश्वरा..

Wednesday, September 29, 2010

प्रथम तुला पहाताना...

सखे आज उगवला बघ दिन सोनियाचा,
पहिला मी प्रथमच मुखडा माझ्या पिल्लाचा..

तुला पहाताना बाबांची पापणी मिटेना,
तुझी प्रत्येक हालचाल माझ्या मनातुन सरेना..

छोटुकली ही कळी कशी उलमते आहे आतल्या आत,
बाबा म्हणतात पिल्लु नाचतयं पोटातल्या पोटात..

तुझी heartbeat ऐकली, तुझं heart पाहिलं,
माझ्याच उरि तेव्हा किती धकधक झालं..

परत केव्हा दिसतील् ते एवलेशे हात-पाय,
कोकराला पहायला आतुर तुझी ही माय॥

Tuesday, August 17, 2010

गोड चाहुल पहिली...

ती गोड रेशमी संध्याकाळ गुलाबी झालर ल्याली होती,
कारण देवतांनी अलगद येउन ओटी माझी भरली होती..

गोड नाजुक रोपटं फुलेल आता माझ्या अंगणी,
कोणास ठाऊक काय असेल, मोगरा कि रातराणी..

हासु आणि मस्तीने आता माझं घर भरेल,
बाळाच्या लडिवाळ बोलण्याने ते ही सुखावेल..

शब्दानां गोंजारत जेव्हा पिल्लु लागेल बोलु,
ते ही म्हणतील, या गोडव्यात अर्थच विसरुन जाऊ..

किती स्वप्नं माझी मी आतापासुन रंगवतेय,
तुला मांडीवर घ्यायची मी खुप वाट पहातेय..

Thursday, November 5, 2009

बाबा

"दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीप खरेंनी लिहीलेलं आहे. या गाण्याला उत्तर म्हणून..

कोमेजलेल्या तुमच्या परीची सांगु का तुम्हाला कहाणी,
अस्वस्थ करतात तिला तिच्या बाबांच्या आठवणी..

बागेत कधी तिच्यासोबत लहान झालेले बाबा,
एखाद्या रविवारी picture दाखवणारे बाबा॥
घरी स्वतःच्या ताटातला अर्धा घास कमी करुन,
सगळे माझे हट्ट हसुन पुरवणारे बाबा..

झोपेतही जाणवायचा मला तो मायेचा स्पर्श,
आले बाबा या जाणीवेने मनी दाटलेला हर्ष..

कधी खेळला नसाल बाबा कदाचित माझ्यासोबत;
माझ्या भातुकलीच्या खेळात नेहमीच तुमचा घास होता॥
आई असेल जवळ जरी जेव्हा उभी रहायला शिकले,
दुरुन पहाणारा बाबाही तितकाच हवाहवासा होता..

जरी कमी दिली मला तुमची सोबत देवाने,
खुप सारं जगुन घेतलं मी तुमच्या सहवासात..
जगले ना मी आई सोबत तुमच्याच आठवणीने,
तुम्ही गेल्यानंतरच्या वीस वर्षांत..

लहानपण असेल माझं बाबा तुम्हाविना गेलं,
मी कशी शिकले, कशी खेळले॥ काहीच नाही तुम्हाला पाहता आलं..
पण आहे अजुन ही माझ्या मनात संस्कारधन तुम्ही दिलेलं,
सजवेन मी माझं आयुष्य तुमच्या आठवणींत भिजलेलं..